विवाहितेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत कामगाराच्या मुलाचे अपहरण; श्रीगोंदा पोलिसांनी केली सुटका

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – विवाहितेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत कामगार दाम्पत्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार नऊ जूनला बजाजनगरमध्ये घडला. आरोपी सागर गोरख आळेकर (रा. श्रीगोंदा) याला श्रीगोंद्यातून अटक करून मुलाची सुटका करण्यात आली. तो विवाहितेच्या भावाचा मित्र आहे.

वाळूजच्या सावरकर कॉलनीत एक ३६ वर्षीय कामगार, ३३ वर्षीय पत्नी व सहा वर्षांच्या मुलासह किरायाने राहतात. त्याची पत्नी व मुलगा घरी असताना, मेव्हण्याचा मित्र आळेकर सकाळी नऊला कार घेऊन आला. दाम्पत्याने त्याला जेऊही घातले. नंतर त्याने विवाहितेला मोहटा देवी मंदीराजवळ बोलावून घेतले व तिला कारमधून येण्यास सांगितले. त्याला नकार देत दाम्पत्य घरी परतले. तेव्हा आळेकरही घरी आला आणि त्याने सहा वर्षांच्या मुलाला बळजबरीने कारमधून श्रीगोंदा येथे नेले. भयभीत दाम्पत्याने दुचाकीने थेट श्रीगोंद्याला धाव घेत पोलिस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला.

पोलिसांनी तात्काळ धाव घेत आळेकरला ताब्यात घेतले. मुलाची सुटका करून कामगार दाम्पत्याच्या स्वाधीन केले. श्रीगोंदा पोलिसांनी आळेकरला एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here