मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांना आणि बॉलीवूडशी संबंधित असणाऱ्यांना अमेरिकन गांजा देणाऱ्या दोन युवकांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. हमजाद शबीर खंबाटी, प्राणसुख शांतीलाल सेवक ऊर्फ रांगा अशी त्या दोघांची नावे असून एका अल्पवयीन मुलाची रवानगी बालगृहात केली आहे. त्या तिघांकडून ओशिवरा पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचा अमेरिकन गांजा जप्त केला आहे.
अंधेरीच्या लोखंडवाला येथे काही युवक हे गांजा तस्करी करत असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांना मिळाली. त्या माहितीनंतर वरिष्ठ निरीक्षक संजय बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री लोखंडवाला परिसरात सापळा रचला. अमेरिकन गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या प्राणसुख आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांकडून पोलिसांनी काही गांजा जप्त केला. प्राणसुखच्या चौकशीत हमजादचे नाव समोर आले. त्याला गोरेगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या तिघांकडून पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपये किमतीचा अमेरिकन गांजा जप्त केला.
गांजा तस्करीप्रकरणी हमजाद आणि प्राणसुखविरोधात गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली. त्या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ते तिघे अमेरिकन गांजा कुठून आणायचे, आतापर्यंत कोणत्या बॉलीवूडशी संबंधित असणाऱयांना त्या तिघांनी गांजा दिला याचा तपास ओशिवरा पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीबीने अंधेरीच्या लोखंडवाला येथे कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली होती.






