सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वऴण लागलं आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी हा एफआयआर पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. रियाने सुशांतकडून पैसे घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केके सिंह यांनी केला आहे. आयपीसीच्या कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुशांतचे वडील केके सिंह यांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की, मुंबई पोलिसांकडून केलेल्या तपासणीवर त्यांना विश्वास नाही. त्यामुळे पाटणा पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. केके सिंह यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. केके सिंग यांच्या तक्रारीनुसार, रियाने सुशांतची फसवणूक केली असून त्याच्याकडून पैसे हडपले. तसंच सुशांतला कुटुंबातून पूर्णपणे वेगळं केलं होतं.
पाटण्याचे एसएसपी उपेंद्र शर्मा यांच्या आदेशानुसार राजीव नगरचे पोलीस स्टेशन प्रभारी या प्रकरणाचे आयओ बनविण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची टीम मुंबईला पाठविली आहे. ही टीम मुंबई पोलिसांना भेटून केस डायरीशिवाय आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करेल. या टीममध्ये दोन निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here