लंडन – शॉपिंगवरून लवकर घरी बोलावल्याचा राग मनात ठेवून एका पत्नीने आपल्या पतीच्या अंगावर उकळते पाणी फेकून त्याची हत्या केली. इंग्लंडमधील नेस्टन शहरात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी कोरिना बेंसला अटक केली आहे. आरोपी ५९ वर्षीय कोरिनाने आपल्या ८१ वर्षाच्या पतीची हत्या केली. या दोघांच्या विवाहाला ३८ वर्षे झाली होती.
आरोपी कोरिंनावर कोर्टात गुन्हा सिद्ध झाला असन ९ जुलै रोजी तिला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मागील वर्षी १४ जुलै २०२० रोजी ही घटना घडली. रुग्णालयात उपचार सुरू असताना पती मायकल बेंसचा मृत्यू झाला. कोरिंनाने पोलिसांचे आरोप फेटाळले होते. मात्र, कोर्टात पोलिसांनी तिच्यावरील आरोप सिद्ध करून दाखवले.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डिटेक्टिव चीफ इन्स्पेक्टर पॉल ह्युज यांनी सांगितले की, कोरिनाने आपल्या पतीच्या अंगावर फक्त उकळते पाणी टाकले. या उकळत्या पाण्यात जवळपास तीन किलो साखरदेखील होती. जेणेकरून तिचा नवरा मायकल बेंस अधिकच जखमी झाला पाहिजे. पती घरी झोपला असताना तिने हे कृत्य केले. त्यानंतर रुग्णवाहिकेला तिनेच तातडीने बोलावले. घाबरलेल्या कोरिना शेजाऱ्यांजवळ जाऊन दु:ख व्यक्त करत असताना तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपल्याकडून मोठी चूक झाली असल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरिनाने तातडीने रुग्णवाहिकेला बोलावले असते तर मायकलवर वेळीच उपचार झाले असते आणि त्याचे प्राण वाचले असते.






