सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असल्याने आषाढी यात्रेला १७ ते २५ जुलै या काळात पंढरपूर शहर आणि परिसरातील १० गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
यंदा सर्व मानाच्या १० पालख्या बसमधून दशमीदिवशी पंढरपूरमध्ये येणार असून, पौर्णिमेला परत जाणार असल्याने सात दिवस संचारबंदीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
या काळात सोलापूर जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार असून, परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. काही भाविक जर पंढरपूरकडे आले, तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठविले जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
आषाढी यात्राकाळात चंद्रभागास्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून चंद्रभागा परिसरात १४४ कलम जारी केले जाणार आहे. ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे, अशा भाविकांना पासेस देऊन त्यांनाच नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सध्या सोलापूर जिह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.






