पुण्यात दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू

पुणे (अमोल सोळंके) – बुधवारी कोरोनाचे 50 बळी गेले. मृतांमध्ये येरवड्यातील एका नऊ महिन्याच्या बालिकेसह पुणे शहरातील 39 आणि पिंपरी-चिंचवडच्या 11 जणांचा समावेश आहे. 2385 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 1308 तर पिंपरी-चिंचवडमधील 1077 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे शहरात बुधवारी ‘आरटीपीसीआर’ व अँटिजेन चाचणीसाठी 5,919 संशयितांचे नमुने घेण्यात आले. आतापर्यंत 2 लाख 61 हजार जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1308 नमुने बुधवारी पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत 51,738 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात 2543 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसातील हे सर्वाधिक डिस्चार्ज आहेत. तर आतापर्यंत 32,623 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 17,861 सक्रिय रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 845 रुग्ण गंभीर असून 432 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान बुधवारी पुणे शहरात 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी 23 पुरुष तर 16 महिला आहेत. या मृतांचे वय 9 महिने ते 88 च्या दरम्यान होते. नऊ महिन्यांची बालिका भाजलेली होती तसेच तिच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उरलेले रुग्ण कात्रज, मुंढवा, गणेश पेठ, फुरसुंगी, भवानी पेठ, कसबा पेठ, धनकवडी, येरवडा, माळवाडी हडपसर, मंगळवार पेठ, जनता वसाहत, बुधवार पेठ, कर्वे रोड, रामटेकडी, वडगाव बुद्रुक, धानोरी, महात्मा फुले पेठ, हिंगणे, आंबेगाव, वानवडी, बोपोडी, शुक्रवार पेठ, बिबवेवाडी, चंदननगर, बाणेर, पाषाण, घोरपडी पेठ, कात्रज येथील रहिवाशी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1254 वर पोचली.
पिंपरी-चिंवड शहरात कोरोनाचे 1,077 नवे रुग्ण आढळले असून एकूण संख्या 19,686 झाली आहे. तर सक्रिय 3,142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी 5,172 संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आणि कोरोनातून बरे झालेल्या 316 रुग्णांना घरी सोडण्यात आले. एकूण संख्या 12,278 झाली आहे. उपचारादरम्यान दापोडीतील 2 तरुण (27 व 32), भोसरीतील पुरुष (52), पिंपरीतील पुरुष (80), चिंचवड गावातील पुरुष (86), दिघीतील महिला (40), खराळवाडीतील पुरुष (68), निगडीतील महिला (65), चाकणमधील महिला (43), पाषाणमधील पुरुष (65), शिरूरमधील पुरुष (79) या 11 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 393 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री आज पुण्यात घेणार कोरोनाचा आढावा
पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्‍वारंटाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. मात्र, पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशाचे अनुदान राज्य सरकारने दिलेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या वेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः उत्तर देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या वेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्‍त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. राज्यातील सरकार मुंबईकडे जितके लक्ष देते तितके पुण्याकडे देत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here