प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय
नवी दिल्ली : कोरोना काळात बंद असलेली ‘राजधानी एक्स्प्रेस’ १ जुलैपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून धावणारी ही मुंबई-हजरत निजामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस विशेष ही गाडी गुरुवार १ जुलैपासून रोज सुरु राहणार असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. यासोबतच या गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता गुरुवारपासून पुढील सूचनेपर्यंत १२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दिन विशेष गाडी प्रवाशांसाठी दररोज धावणार आहे. तर ०१२२२ हजरत निजामुद्दिन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष राजधानी शुक्रवारपासून रोज धावणार आहे.
सध्या ही गाडी आठवड्यातून ४ दिवसचं सुरु आहे. परंतु ही गाडी दररोज सुरु झाल्यास रेल्वे प्रशासनाला वाढती गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. या विशेष राजधानी ट्रेनचे तिकिट बुक करण्याची सुविधा सर्व पीआरएस केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. परंतु या विशेष गाडीत फक्त कन्फर्म तिकीट असणार्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल.






