नवी दिल्ली : येथील गाजीपुर सीमेवर भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांदरम्यान बुधवारी राडेबाजी झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात मारहाण केल्याचा आरोप केला आहे. भाजपचे काही कार्यकर्ते गाजीपुर बॉर्डरवर एका नेत्याच्या स्वागतासाठी गेले होते. त्यावेळी ही राडेबाजी झाली. शेतकऱ्यांनी दंगा करीत मारहाण केल्याचा तसेच दगडफेक केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
घटनास्थळावरची परिस्थिती इतकी खराब झाली होती की जो नेता आला होता, त्याची गाडी बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत करावी लागली. सदर प्रकारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे कार्यकर्ते आमच्या मंचावर येउन संबंधित नेत्याचे स्वागत करीत होते, असा दावा टिकैत यांनी केला. मंच रस्त्यावर आहे, याचा अर्थ कोणीही मंचावर यावे. मंचावर यायचे असेल तर भाजपला सोडचिठ्ठी देऊन या, असेही ते म्हणाले.
मंचावर जे लोक पक्षाचा झेंडा घेऊन येतील, त्यांचा इलाज केला जाईल. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे लोक मंचाचा कब्जा घेऊ पाहत होते, असा आरोप टिकैत यांनी केला. दरम्यान शेतकऱ्यांना लाठी-काठ्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे भारतीय किसान यूनियनने सांगितले आहे. या हल्ल्यात काही शेतकरी जखमी झाले असल्याचे भाकियुने म्हटले आहे.






