खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती
देहू (प्रतिनिधी सुनिल भोसले) : यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट आहे. याच सावटाखाली देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज (१ जुलै) प्रस्थान झाले. भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे या वेळी उपस्थित होते. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरुन एक ही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान झाले आहे.
दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. ऊनवारापावसाची कोणतीही पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रस्थान झाल्यानंतरही तुकाराम महाराजांच्या पादुका १ ते १८ जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहे. त्यानंतर १९ जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत
वारकरी संप्रदायाचा सर्वात सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. २० जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. देहूमध्ये आज होणाऱ्या तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला एकूण ३५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30) हा आदेश देण्यात आला. या पूर्वी परवानगी दिलेल्या 100 भाविकांसह जादा २५० भाविकांना परवानगी सोहळ्याला हजर राहण्याची परवानगी देण्यात आला आहे.






