भारतीय लशीमुळे ब्राझीलमध्ये मोठा गदारोळ; राष्ट्रपती संशयाच्या भोवऱ्यात

कोवॅक्सिन खरेदी घोटाळा; ब्राझीलच्या राष्ट्रपतींच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

साओ पाओलो : ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सनारो यांना मोठा धक्का बसला आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोवॅक्सिन लस खरेदी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. या चौकशीचा अहवाल ९० दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

ब्राझीलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझील सरकारने भारतीय कंपनी भारत बायोटेकसोबत लस खरेदी करारावर स्वाक्षरी केली. यामध्ये एका डोसची किंमत १५ डॉलर (जवळपास १११७ रुपये) सांगण्यात आली. तर, दिल्लीतील ब्राझील दूतावासाच्या एका गुप्त माहितीनुसार कोवॅक्सिन लशीच्या एका डोसची किंमत १.३४ डॉलर (जवळपास १०० रुपये) होती.

लस खरेदीच्या घोटाळ्यावरून ब्राझीलमधील विरोधी पक्षांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुप्रीम कोर्टात धाव या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी ९० दिवसांत पूर्ण करून सुप्रीम कोर्टाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

लस खरेदी कराराबाबत राष्ट्रपती बोल्सनारो यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, ब्राझीलच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात डाव्या आणि मध्यममार्गी विचारांच्या पक्षांनी राष्ट्रपती बोल्सनारो यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here