सैन्याच्या बेजबाबदारपणामुळे शस्त्रे आणि लष्करी वाहने तालिबानच्या हाती
काबूल : अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून दहशतवादाचा खात्मा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेने सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली आहे. अमेरिकन लष्कर सैनिकी तळ सोडण्याच्या प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकन लष्कराची वाहने, शस्त्रास्त्रे हे अफगाण सैन्याऐवजी तालिबानच्या हाती जात असल्याचे म्हटले जाते आहे.
‘फोर्ब्स’च्या एका वृत्तानुसार, मागील महिन्यात तालिबानने अमेरिकन सैन्याचे ७०० ट्रक आणि चिलखती वाहनांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये अमेरिकन लष्कर वापरत असलेले हॉवित्जर तोफ आणि लष्करी वाहन हम्वीजचाही समावेश आहे. तालिबानने अमेरिकन लष्कराच्या वाहनांवर, शस्त्रांवर ताबा मिळवल्याने सरकारी यंत्रणेचे अस्तित्व संपुष्टात आले असल्याचे म्हटले जाते.
अमेरिकेने ही शस्त्रे अफगाण सैन्याकडे सुपूर्द करण्याऐवजी अथवा विक्री करण्याऐवजी अशीच सोडून दिली. अमेरिकन लष्कराची शस्त्रे, लष्करी वाहने हाती आल्यामुळे तालिबान आणखी मजबूत होण्याची भीती आहे. अमेरिकेने अचानकपणे सैन्य माघारी घेतल्यामुळे अफगाणिस्तानमधील सरकार नावाची यंत्रणा संपुष्टात आली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. येत्या काही महिन्यांमध्ये तालिबान काबूलवरही ताबा मिळवू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे






