इस्लामाबाद : पाकिस्तानमधील लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकात मुंबईत झालेल्या २६/११ बॉम्ब हल्ल्यांचा मुख्य सुत्रधार असणाऱ्या हाफिज सईदच्या घराबाहेर २३ जून रोजी मोठा स्फोट झाला. या प्रकरणामध्ये आता पाकिस्तानने भारतावर आरोप केले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मुईद यूसुफ यांनी रविवारी केलेल्या आरोपांनुसार २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख असणाऱ्या सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामध्ये एका भारतीय नागरिकाचा हात होता.
पंजाब पोलिसांचे प्रमुख आणि माहिती मंत्री फवाद चौधरी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना एनएसए यूसुफ यांनी या हल्ल्यामध्ये भारतीय व्यक्तीचा सामावेश असल्याचा दावा केलाय. भारताची गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या रॉशी या व्यक्तीचा संबंध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. “या दहशतवाद्यांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. या चाचण्यानंतरच आम्ही हल्ल्यातील मुख्य दहशतवादी आणि हल्ला घडवून आणणाऱ्यांची ओळख पटवलीय,” असं एनएसए यूसुफ यांनी म्हटलं आहे.
एनएसए यूसुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या हल्ल्याचा कट रचणारा व्यक्ती भारतीय गुतप्तचर यंत्रणा रॉशी (रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग) संबंधित असून दुसरा भारतामध्ये आहे, हे तुम्हाला सांगताना आमच्या मनात कोणतीही शंका नाहीय,” असं म्हटलंय. मात्र नक्की ही व्यक्ती कोण आहे याची माहिती यूसुफ यांनी दिली आहे.
I instructed my team to brief nation on findings of Johar Town, Lahore blast investigation today. I appreciate the diligence & speed of Punjab Police’s Counter Terrorism Dept in unearthing the evidence & commend the excellent coordination of all our civil & mly Intel agencies.
— Imran Khan (@ImranKhanPTI) July 4, 2021
पाकिस्तानमधील वेगवेगळ्या यंत्रणांच्या सहकार्याने आमच्याकडे हल्ला घडवून आणणाऱ्यांची खोटी नाव, खरी ओळखपत्रं आणि संक्षयित स्थानकांबद्दलची माहिती आहे, असंही यूसुफ म्हणालेत. या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवरुन, या बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आज देशाला यासंदर्भातील तपासाची माहिती देण्याचे निर्देश मीच दिले होते. तसेच देशातील नागरिक आणि लष्कराशीसंबंधित गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती समोर आली, असं इम्रान म्हणालेत.
लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटीमधील सईदच्या घराबाहेर २३ जून रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता. एका कारच्या मदतीने हा स्फोट घडवण्यात आलेल्या ज्यात तिघांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही.






