पैसे आणि साडी दिली नाही म्हणून ३ महिन्याच्या मुलीला संपवलं
मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : शहरात ३ महिने वयाच्या मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलगी झाल्यावर पैसे, नारळ आणि साडी न दिल्यामुळे रागावलेल्या तृतीयपंथीयांनी या मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. कफ परेड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर खाडीच्या पाण्यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या आई-वडिलांनी पैसे, नारळ आणि साडी या मागण्यांची पूर्तता न केल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून मुलीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.






