दोन देशांतील सदस्यांना कोरोनाची लागण
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. पण क्रीडा महोत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना दोन देशांतील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा एकदा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जपानमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे जपानमधील सरकारने २२ ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकमधील क्रीडा स्पर्धांसाठी प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. आता दोन देशांतील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
ऑलिम्पिक मशाल (ज्योत) शुक्रवारी टोकियो येथे दाखल झाली. या वेळी क्रीडा ज्योतीचा आगमन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. टोकियो येथे शुक्रवारी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे ऑलिम्पिक मशाल सुरक्षा कवच असलेल्या कंदिलामधून आणण्यात आली. याप्रसंगी टोकियोचे गव्हर्नर युरिको कोएके यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली.






