रजनीकांत यांचा राजकारणाला रामराम; मक्कल मंदरम संघटना केली बरखास्त

चैन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी यांनी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर करत अखेर राजकारणाला रामराम ठोकला आहे. रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करत राजकारणच्या दिशेनं सुरु केलेला प्रवास थांबवला आहे. संघटनेच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रजनीकांत यांनी निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असं देखील रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याची घोषणा करताना रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करुन ‘रजनीकांत रसीगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’ म्हणून काम करेल, असं जाहीर केलं.

२९ डिसेंबर २०२० रोजी रजनीकांत यांनी जाहीर केलं होतं की आपण राजकारणात प्रवेश करणार नाही. पण अलीकडेच त्यांनी राजकारणात येण्याबाबत पुन्हा चर्चा करणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रजनीकांत यांच्या राजकारणात परत येण्याच्या चर्चेवरुन तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

रजनीकांत यांनी डिसेंबर २०२० मध्ये जानेवारी २०२१ मध्ये पार्टी सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. हे सर्व तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी घडलं होतं. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रजनीकांत यांनी यू टर्न घेतला आणि ते राजकारणात सामील होणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर रजनीकांत यांच्या संघटनेचे अनेक सदस्य द्रमुकसह अन्य पक्षात सामील झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here