इस्रायलमध्ये दूतावास उघडणारं पहिलं अरब राष्ट्र
तेल अवीव : अनेक वर्षांच्या कटुतेनंतर इस्रायल आणि अरब देशांमध्ये मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीने बुधवारी औपचारिकपणे इस्रायलमधील आपले दूतावास सुरू केले आहे. राजकीय मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर एकाच वर्षात दोन्ही देशांनी दूतावास सुरू केले आहे.
राजधानी तेल अवीवमधील एका समारंभात बोलताना इस्त्रायली राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्जोग यांनी की, दूतावास उघडणे हे मध्यपूर्वेतील शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेच्या भविष्याकडे वाटचाल करण्याच्या आमच्या सामायिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री यायर लॅपीड यांनी जूनमध्ये युएई दौरा केला होता. त्यावेळी इस्रायलने अबूधाबी येथील आपल्या दूतावासाची सुरुवात केली. त्याच्या दोन आठवड्यानंतर आता इस्रायलमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे दूतावास सुरू झाले आहे.
अनेक वर्षांच्या कटुतेनंतर दोन्ही देशांमध्ये संबंध स्थापित झाले आहेत. अमेरिकेने यासाठी मध्यस्थी केली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हाइट हाउसमध्ये याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.






