गाझियाबाद : येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या व्हर्च्युअल बैठकीत दोन कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. हाणामारीदरम्यान लाथा-बुक्क्यांचा मार खावून एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका कार्यकर्त्याने सिहानी गेट पोलीस स्थानकात तक्रार दिली तर दुसऱ्या कार्यकर्त्याने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी गाझियाबादमधील भाजप कार्यकर्ते नेहरू नगरमधील कार्यालयात जमा झाले होते. भाजप प्रदेश समितीचे सदस्य पृथ्वी सिंह आणि पवन गोयल यांच्यात चर्चा सुरू असताना माजी आमदार प्रशांत चौधरी हे तिथे दाखल झाले. प्रशांत चौधरी यांनी या दरम्यान एक विधान केल्याने पवन गोयल यांनी त्यांना रोखले व त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
दरम्यान, माजी आमदार प्रशांत चौधरी यांनी पवन गोयल यांच्यावर जातिवाचक टिपण्णी केल्याचा आरोप आहे. वैश्य समाजावर चुकीची टिपण्णी केल्याने दोघांमध्ये वाद झाला. प्रशांत चौधरी यांनी पवन गोयल या कार्यकर्त्याची धुलाई केली. या हाणामारीत पवन गोयल गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोहिया नगरमधील गायत्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पवन गोयल याने प्रशांत चौधरी यांच्याविरोधात हत्येची धमकी दिल्याचा आरोप केला असून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.






