स्पार्कासन करंडक बुद्धिबळ स्पर्धा : विश्वनाथन आनंदने क्रॅमनिकला नमवले

डॉर्टमंड : माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने रविवारी चौथ्या डावात परंपरागत प्रतिस्पर्धी व्लादिमिर क्रॅमनिकला बरोबरीत रोखले आणि स्पार्कासन करंडक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. चार डावांच्या ‘नो कॅसलिंग’ लढतीत आनंदने क्रॅमनिकाला २.५-१.५ अशा फरकाने हरवले. निर्णायक डावात टॅरॅश व्हॅरिएशनचा डाव रचत आनंदने ४० चालींनंतर क्रॅमनिकशी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

आनंदने मंगळवारी सलामीचा डाव जिंकत आघाडी घेतली, मग बुधवारी दुसरा डाव बरोबरीत सुटला. तिसऱ्या डावात आनंद आणि क्रॅमनिकने ६१ चालींत बरोबरी स्वीकारली. क्रॅमनिकने चिवट झुंज देत आव्हान जिवंत राखले होते. सामन्यातील उत्कंठा वाढवण्यासाठी ‘नो कॅसलिंग’ लढतीत कॅसलिंगला परवानगी नसते. बुद्धिबळात राजाच्या संरक्षणासाठी ‘कॅसलिंग’ या एकाच चालीत राजा आणि हत्ती हे दोन मोहऱ्यांच्या जागा बदलता येतात. गेल्या आठवडय़ात झॉग्रेब येथे झालेल्या क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत आनंदने उपविजेतेपदासह दिमाखदार पुनरागमन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here