जळगाव (क्राइण रिपोर्टर शाहिद खान) : ८ जुलैला जामनेर जि. जळगाव येथील व्यापारी अलीम सलीम खाटिक हे त्यांच्या नातेवाईक हंसा यांचेकडील पिकअप (वाहन क्रमांक एन.एच.४८ एजी ८७६९) मधून बकरी ईद करिता कल्याण येथे बकरे विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पहाटेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरेगाव शिवारात मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. नाशिक पोलिसांनी तात्काळ दखल घेत या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ८ जुलैला जामनेर जि. जळगाव येथील व्यापारी अलीम सलीम खाटिक हे त्यांच्या नातेवाईक हंसा यांचेकडील पिकअप (वाहन क्रमांक एन.एच.४८ एजी ८७६९) मधून बकरी ईद करिता कल्याण येथे बकरे विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पहाटेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरेगाव शिवारात मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना पिकअप गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र पिकअप गाडीवरील चालक नितेश निकम व अलीम खाटीक यांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवली नाही. त्यामुळे मोटारसायकलस्वारांनी पिकअपच्या दिशेने गोळीबार केला. पिकअपमध्ये बसलेल्या जावेत रज्जाक खाटिक यांच्या डोक्याच्या डाव्या बाजून गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
याबाबत अलीम सलीम खाटिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०३/२०२१ भादंवि ३०७, ५०४, ५०६, ३४, सहा ऑर्म ॲक्ट ३/१५ व ५/२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील जखमी झालेले जावेद खाटिक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्यात पोलिसांनी ३०२ कलम वाढविले.
या घटनेबाबत नासिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी मालेगाव नजिकच्या जिल्ह्यात तपास पथके रवाना केली. आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून संशयित हासिम पिंजारी उर्फ पापा गोल्डन (रा.दरेगाव शिवार, मालेगाव), गोपाळ गिरासे (रा.साकरी रोड, धुळे), सैय्यद अबूजर (रा.नयापूरा, मालेगाव), मकसूद अहमद उर्फ मत्से (रा.रहेमानपुरा, मालेगाव), मोहम्मद साजिद उर्फ मिर्ची (रा.राजापूरा, मालेगाव), मोहम्मद अकरम उर्फ मंथन चौखा (रा.गोल्डन नगर, मालेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलदेखील सापडली आहे. गुन्ह्यातील बंदुक (अग्निशस्त्र) तुकडे करुन नदीत फेकल्याची कबुली दिल्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या बंदुकीचे तुकडे जप्त केले. पुढील तपास पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये व त्यांचे पथक करीत आहे.
सदरची कारवाई नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये, पोहवा सचिन धरणकर, पोना भरत गांगुर्डे, पोना विनायक, पोका नवनाथ शेलार, सचिन भामरे, अंबादास डांमसे, राकेश जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला होता.






