धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) : योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या 307 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुरूषोत्तम वैद्य यांनी सीना समाचारला दिली. दि 19 जुलै ते 22 जुलै या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत. पुण्यतिथी उत्सवातील सर्व कार्यक्रम दूर दृष्य श्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत .तसेच मंदिरामध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी नाही .त्यामुळे यंदाही सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह द्वारा होणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातून होणार आहेत. कल्याण स्वामी मठ परंडा या फेसबुक पेजवर या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे. या फेसबुक पेजला लाईक करून हे कार्यक्रम पाहता येतील .सर्व भक्तांनी दासबोध पारायण आपल्या घरी करायचे आहे .
सोमवार दि 19 जुलै रोजी दुपारी 3 ते 4 स .भ . रामचंद्र महाराज तंजावर यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी 4.30 ते 6 पर्यंत स .भ. सौ लक्ष्मीताई पोतदार बेळगाव यांचे कीर्तन होईल मंगळवार दि 20 जुलै रोजी दुपारी 3 ते 4 स .भ . दुर्गाप्रसाद स्वामी सज्जनगड यांचे प्रवचन होणार असून 4.30 ते 6 स भ. सौ अनिताताई नरगुंदकर बेळगाव यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दि 21 जुलै रोजी कल्याण स्वामी मठाकडून संकल्पित करण्यात आलेल्या 3 कोटी 70 लाख त्रयोदशाक्षरी रामनाम जपाची सांगता केली जाणार आहे. दुपारी 3 ते 4 स .भ . डॉ दत्तात्रय रत्नाळीकर यांचे प्रवचन होईल . दुपारी 4.30 ते 6 स भ सौ वृषालीताई कुलकर्णी कोल्हापूर यांचे कीर्तन होणार आहे.
गुरूवार दि 22 जुलै रोजी सकाळी 8.30 वा श्रींना अभिषेक होणार असून 10.30 वा दासबोध पारायण समाप्ती केली जाणार आहे. सकाळी 11 ते 12.30 स भ कौस्तुभबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे . त्यानंतर गुलाल उधळून उत्सवाची सांगता होणार आहे. समर्थ भक्तांनी या सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हावे ,असे आवाहन कल्याण स्वामी मठाकडून करण्यात आले आहे.






