मुंबई (जॉनी वाझ) – अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे.
कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवलं होतं. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. दरम्यान युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होतं. त्यांच्या या साहसाची एक झलक आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.







