सह्याद्री वाहिनीच्या ‘धिना धिन धा’ चे सदानंद राणे

    सह्याद्री वाहिनीच्या ‘धिना धिन धा’ या नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. त्यासाठी परीक्षक असतात ठाण्यातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे आणि सचिन शंकर यांची मेव्हणी इंदुमती लेले. २००७ ते २०१३ सातत्याने या कार्यक्रमात राणे यांचे दर्शन होत असतं आणि त्यांच्या नृत्यविषयक ज्ञानाचा लाभ कार्यक्रमातील कलाकारांना मिळत असतो. या कार्यक्रमामुळे राणे घराघरात आणि खेडोपाडी माहीत झाले आहेत.

     

    राणे यांना लहानपणीच संगीताचा वारसा मिळाला तो वडिलांकडून. वडील भजनीबुवा होते आणि सदानंद सतत यांच्याबरोबर असायचा. तालवाद्ये लहानपणीच माहित झाली होती. पावले तालात पडू लागली होती. पुढे मुंबईत आल्यावर लोकनृत्याचे शिक्षण नृत्य दिग्दर्शक रमेश पुरव मास्तर यांचेकडून घेतले. पण शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले पाहिजे हे इतरांना नृत्य प्रशिक्षण देताना जाणवायचे. विद्यार्थ्यांचे पालकही सातत्याने त्यांच्या शास्त्रीय नृत्याच्या शिक्षणा बद्दल विचारायचे. १९६९ साली त्यांना नोकरी मिळाली नेहरू सायन्स सेंटर, मुंबई येथे. कामाची वेळ होती १० ते ५. आणि नृत्यशिक्षक डॉक्टर राजकुमार केतकर यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घ्यायला ठाण्यात यावे लागे. याची वेळ होती सकाळची. नृत्याची आवड असल्याने सदानंद यांनी हा प्रवास अत्यंत आनंदाने केला. मुंबईहून ठाण्यात येऊन सकाळचा क्लास करून पुन्हा सकाळी दहा वाजता मुंबईच्या नोकरीत रुजू व्हावे लागे. पण हे शिक्षण आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे याची सदानंद यांना जाणीव होती.

     

    “गुरूंनी जे शिक्षण दिले त्यामुळे आज आयुष्यात मी उभा आहे. पण कवी वसंत बापट यांनी कलापथकात आमच्यावर जे संस्कार केले त्यामुळे आयुष्याला दिशा मिळाली. ते खरे माझे आयुष्याचे दिग्दर्शक ठरले. ” राणेसर वसंत बापट यांचे ऋण व्यक्त करताना म्हणाले.

     

    १९७० पासून जवळजवळ दहा वर्ष सदानंद राणे ‘राष्ट्र सेवा दल कलापथक’ यात काम करत होते. वसंत बापट यांच्या समवेत महाराष्ट्रातील ठीकठिकाणी कार्यक्रम सादर करण्यासाठी कलाकार म्हणून गेले. ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, ‘आजादी की जंग’, ‘शिवदर्शन’ या कार्यक्रमातून नाट्य नृत्य कलाकार म्हणून भाग घेऊन संपूर्ण भारत दौरा कवी वसंत बापट, लोकशाहीर लीलाधर हेगडे, नृत्य दिग्दर्शिका सुधाताई वर्दे यांच्यासमवेत केला. एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची संकल्पना रंगमंचावर प्रत्यक्षात कशी उतरवावी याचे प्रशिक्षणच एक प्रकारे तिथे मिळाले.

     

    सदानंद राणे यांनी अनेक विद्यार्थी घडवले देखील आहेत. त्यांना लोकनृत्याची अनेक शिबिरे घेण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून, अनेक संस्थांमधून शिक्षण देण्यासाठी आमंत्रित करीत असतात. पालघरच्या आदिवासी भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले. काही कार्यशाळांचा उल्लेख करत आहे. ‘काला घोडा फेस्टिवल 2011’, ‘चिल्ड्रन लोकसत्ता’, ‘युवक बिरादरी, भारत’, ‘इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई’, ‘विधायक संसद श्रमजीवी संघटना, वसई’ अशा अनेक संस्थांतर्फे आणि मोठ्या संमेलनांमध्ये कार्यशाळा घेतल्या. १९९५ ते २०१३ ‘लिटिल एंजल्स सॅम्पल इंग्लिश स्कूल फोर अप्रोप्रिएट लर्निंग’ येथील मतिमंद मुलांच्या शाळेत लोकनृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी १९९५ ते २०१३ मध्ये अठरा वर्षे सातत्याने नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे जात. मतिमंद मुलांच्या आयुष्यात नृत्यामुळे खूपच आनंद निर्माण झाला तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकास झाला.

     

    गरीब विद्यार्थ्यांमध्येही कलाकार असतात. पण त्यांना नृत्याच्या क्लासला जाणे, तेथे क्लासची फी भरणे परवडत नसते. कामगार वस्तीतील आर्थिक दुर्बल घटकांसाठी, निरनिराळ्या वयोगटातील मुला-मुलींना प्राधान्य देऊन नाट्य, संगीत शिक्षण विनामुल्य देऊन त्यांना रंगमंच मिळवून देण्यासाठी १९८५ साली सदानंद राणे यांनी सांस्कृतिक चळवळ जपणारी ‘पदन्यास’ या संस्थेची स्थापना केली. त्यांच्याबरोबर लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे या उपक्रमात सहभागी होते. या संस्थेतर्फे भारतातील अनेक युवकांना नृत्यप्रशिक्षण मिळाले. राणेसर सांगतात, “कविवर्य वसंत बापट यांच्या समवेत रहात असताना त्यांची पंचाहत्तरी आम्ही रवींद्र नाट्य मंदिर येथे केली होती. बापटांच्या कविता, त्यांची गाणी त्यावर नृत्ये अशा असा भरगच्च कार्यक्रम होता. सुंदर निवेदनाची जोड होती. कवी अरुण म्हात्रे काव्य वाचन करण्यासाठी सहभागी झाले होते. रवींद्र नाट्य मंदिर मध्ये तुफान गर्दी झाली होती. लोक बाहेर देखील उभे होते. आता हाच कार्यक्रम आम्ही ‘रसिया’ या नावाने ‘पदन्यास’ तर्फे करतो.

     

    तसेच मराठमोळा नृत्याविष्कार दाखवणारा ‘महाराष्ट्राचे लोकरंग’ हा कार्यक्रम देखील करत असतो. ‘स्वर मंथन’ हा एक मराठी वाद्यवृंद तयार केला आहे. अशा तऱ्हेने अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत आहोत.”

     

    ठाणे शहरात नाट्य, संगीत, नृत्य या कलांना भरपूर वाव आहे. ठाण्यात कलेची कदर करणारी माणसे आहेत. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालय, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील लोकनृत्य दिग्दर्शकांसाठी भारतीय लोकनृत्याची पूर्णवेळ कार्यशाळा २०१५ मध्ये घेण्यात आली. त्यात सदानंद राणे यांचा समावेश होताच. ही कार्यशाळा ठाण्यात काशिनाथ घाणेकर रंगमंदिर येथे झाली. पुढे सदानंद राणे यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यशाळा घेतल्या. महानगरपालिका शाळा शिक्षण विभाग, संगीत कला अकादमी यांच्यातर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली. सदानंद राणे आता ठाण्यातच स्थायिक झालेले आहेत.

     

    नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे गेली चाळीस वर्ष अनेक प्रतिष्ठित संस्था, निरनिराळ्या वाहिन्या यांच्यावरील लोकनृत्याच्या कार्यक्रमासाठी परीक्षक असतातच. पण याचबरोबर त्यांनी आपले लेखन, वाचन, अभ्यासही सुरू ठेवला.अनेक दैनिके आणि साप्ताहिकात ते लिहीत गेले. ‘दैनिक मातृभूमी’, ‘दैनिक रत्नागिरी टाइम्स’, ‘युनिक फिचर्स पुणे’, ‘साप्ताहिक सुंदर मुंबई’ अशा अनेक वृत्तपत्रांचा उल्लेख करता येईल. पुढे महाराष्ट्रातील लोककलांची व लोकनृत्याची एकत्र माहिती विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना मिळावी म्हणून ‘लोकगंगा’ हे पुस्तक डिंपल प्रकाशन यांच्या तर्फे २०१२ मध्ये प्रकाशित केले. ‘लोकगंगा’ या पुस्तकाला साहित्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट लोकवाङ्मय पुरस्कार मिळाला. तसेच ‘माय मराठी संस्था, सातारा’ यांनी ‘लोकगंगा’ला पुरस्कार दिला. यामुळे सदानंद राणे यांचे एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व लोकांसमोर उभे राहिले.

     

    आदिवासींमध्ये लोकनृत्याची संस्कृतीच असते. ते आनंद झाला की नाचतात. मुद्दाम नृत्याचे प्रशिक्षण घेतले जात नाही. पण त्यांची वृत्ती त्यांच्या पारंपरिक सणांशी ही निगडित असते. त्यांची नृत्ये आपण शिकून घ्यावी आणि आपली त्यांना शिकवावी असे त्यांना वाटत होते. ती संधी चालून आली, विवेक पंडित आणि विद्युत पंडित यांच्यामुळे. हे दोन कार्यकर्ते आदिवासी लोकांमध्ये राहतात आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. त्यांच्या कार्यावर कार्यक्रम सादर करण्याची कल्पना मांडली गेली आणि ती साकार करण्यासाठी पालघरच्या आदिवासी लोकांमध्ये राणेसर दीड वर्षे जाऊन राहिले. ते फक्त शनिवार रविवार घरी यायचे. त्यांनी आदिवासींना लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले. शेतकरी नृत्य, वाघ्या मुरळी, कोळी नृत्य इत्यादी त्यांना शिकवले. तसेच त्यांच्याकडूनही आदिवासी नृत्ये शिकून घेतली. या सर्व मंडळींचा कार्यक्रम घडवण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करणे आवश्यक होते. ठाण्यातील A.V. स्टुडिओमध्ये या सर्व मंडळींना आणून त्यांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी घाट घातला. प्रथम ही आदिवासी कलाकार मंडळी बिचकली. पण नंतर राणे यांनी त्यांना हिंमत दिली आणि आदिवासींनी त्यांच्या भाषेत रेकॉर्डिंग केले. राणे त्यांना मराठीत सांगत होते. पण रेकॉर्डिंग आदिवासी बोली मध्ये करायचे होते. हा कार्यक्रम उत्तम उभा राहिला आणि पालघर येथे वेगवेगळ्या वयाच्या ७५ कलावंतांसह छान सादर केला गेला. त्याचा आणखीन एक प्रयोगही थिएटरला झाला.

     

    लोककलेतील भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी सदानंद राणे यांना पुरस्कार दिले आहेत व अनेक महोत्सवांमध्ये त्यांचे सत्कार झाले आहेत.

    महाराष्ट्र, दिल्ली, म्हैसूर येथील संमेलनामध्ये ते सहभागी होते. महाराष्ट्रातील कलावंतांना जसं परदेशात कला सादर करायला अभिमानास्पद वाटते, तसेच परदेशातील संस्थाना देखील महाराष्ट्रातील कलावंतांचं सादरीकरण महत्त्वाचं वाटत असतं. मॉरीशस येथील महाराष्ट्र मंडळाने (फोक डान्स फेस्टिवल) लोकनृत्याचा महोत्सव आयोजित केला होता. तेथे सदानंद राणे यांनी महाराष्ट्रातील तीस कलावंतांसह सादरीकरण केले. मॉरिशसच्या महिला बालकल्याण मंत्री शिलाबाय बापू यांनी कौतुक केले. तसेच रोटरी क्लब, ठाणे यांनी पुढाकार घेऊन आठ देशांमधील कलाकारांना ठाणे येथे राहण्याची आणि नृत्य प्रशिक्षण देण्याची सोय केली होती. लोककलेचे नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे यांनी या कलाकारांना लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले. तसेच त्यांना ‘सह्याद्री चॅनलच्या’ धिना धिन धा’ मध्ये सहभागी देखील करून घेतले. या परदेशी कलाकारांना अवर्णनीय आनंद झाला.

     

    राणे सर सांगतात, “पूर्वी लोकनृत्याचे कार्यक्रम सर्वत्र होत असत, अनेक मंदिरांमध्ये तसेच गणेशोत्सवापासून इतर अनेक उत्सवांमध्ये होत असत. तसेच हॉटेलमध्ये देखील आम्ही लोकनृत्याचे कार्यक्रम करत होतो. परंतु आता मात्र सर्वत्र वेस्टन डान्स होऊ लागले आहेत. पण लोकनृत्याचे जतन करण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत.”

     

    ज्येष्ठ रंगकर्मी समाजसेविका स्वर्गीय सीमा सदानंद शेलार यांनी कोकण सिंधुदुर्ग ता. कणकली गावातील एक एकर चार गुंठे जागा ‘पदन्यास’ संस्थेला बक्षीस म्हणून दिली. त्या जागेवर ‘कोकण कला आणि संस्कृती संशोधन केंद्र’ उभारण्याचे काम सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग यांच्या सहयोगाने सुरु करीत आहोत अशी माहिती ‘पदन्यास’चे संस्थापक सदानंद राणे यांनी दिली. राणे सर यांच्या कार्यास शुभेच्छा!
    – लेखन मेघना साने

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here