जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील तांबापूरा येथील मुख्य गजबजलेल्या बिलाल चौकातील मदरसा गल्ली येथे दुपारी ४ वाजता एका महिलेला रस्त्यात पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २० जुलै रोजी बकरी ईदच्या पूर्वासंध्येला घडली.
जिंनतबी हुसेन शेख मणियार ( वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता ती घराचे बाहेर निघताना विजेच्या तारांवर टाकलेला आकोडा पावसामुळे व वादळामुळे तुटून पडला. रस्त्याने जातांना या महिलेला विजेचा तार दिसला नाही. तात्काळ आजुबाजुच्या नागरिकांनी तिला शासकीय वैदयाकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर महिलेस मृत घोषित केले.
रुग्णालयात महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा मेहरूणचे नगरसेवक सुनील महाजन यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सात्वंन केले. मयत जिंनतबी यांच्या पश्चात मुलगा सैयद शकील, सुन, नातवंडे असा परिवार आहे.






