जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ‘पोलीस पाटील मेळावा’ व ‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न; ३७ पोलीस पाटलांसह विजेत्यांचा गौरव

जळगाव जिल्हा पोलीस

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | ग्रामीण भागात पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांना नवीन कायदे, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कानळदा रोडवरील समर्थ लॉन्स येथे भव्य ‘पोलीस पाटील मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ‘विश्वासाची लेन्स छायाचित्र व Reels स्पर्धे’चा बक्षीस वितरण समारंभही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘पोलीस पाटील मार्गदर्शक पुस्तिके’चे औपचारिक अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या एकूण ३७ पोलीस पाटलांना विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच ‘विश्वासाची लेन्स छायाचित्र व Reels स्पर्धे’तील विजेते सुमित देशमुख (तरुण भारत), गणेश गांधारी (अमळनेर नगरपरिषद), सचिन पाटील (लोकमत), आबा मकासरे (दिव्य मराठी), भूषण हंसकर (दै. साईमत) व तुषार मानकर (दिव्य मराठी) यांचा गौरव करण्यात आला.
यासोबतच अंमली पदार्थ, सायबर गुन्हे व डायल ११२ यांसारख्या विषयांवर रील्सच्या माध्यमातून जनजागृती करणारे रील स्टार अजय कुमावत यांचाही उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. या आयोजनात सहकार्य करणारे चंद्रकांत नाईक, किशोर ढाके, मयुर पाटील, सुनील पाटील, संजय व्यास, आदित्य नवलखा, जाफर शेख, सचिन खडके, पुष्कराज चौधरी, महेश कुमार पिपियानी आणि सचिन घुगे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा यशस्वी ठरला असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास पोलीस पाटील संघटनांचे राज्य व जिल्हा पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here