सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी बार्शी येथे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्यासह पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी गणेशोत्सव शांततेत, पर्यावरणपूरक आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी शासनाच्या ध्वनीमर्यादेचे तंतोतंत पालन करून ‘नो डीजे, नो डॉल्बी’ या संकल्पनेला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत, तसेच सोशल मीडियावरील संशयास्पद किंवा प्रक्षोभक संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.
याप्रसंगी उपस्थितांनी ‘नो डीजे, नो डॉल्बी’ची सामूहिक शपथ घेतली. यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची स्वतंत्र आढावा बैठक पार पडली. यात संवेदनशील भागांत विशेष गस्त ठेवणे, ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण, सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर रणनीती आखण्यात आली. हा उत्सव आनंद, भक्ती आणि एकोप्याचे प्रतीक असल्याने नागरिक, गणेश मंडळे व पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.








