दीपक चहरच्या अफलातून खेळीवर भारताची तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

कोलंबो : आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक चहरच्या अफलातून खेळीने शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या खेळीत श्रीलंकेच्या हातातून सामना खेचत टीम इंडियाने मालिका विजय मिळविला आहे. श्रीलंकेवर ३ गडी राखून विजयी होत सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका विजयदेखील साजरा केला आहे.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. सूर्यकुमार यादवने अर्धशतक केले. मात्र, तो बाद झाल्यावर भारताचा पराभव समोर दिसू लागला होता. त्याचवेळी आठव्या क्रमांकावर आलेल्या दीपक चहरने बहारदार खेळी केली. त्याने ८२ चेंडूत नाबाद ६९ धावांच्या खेळीत ७ चौकार व १ षटकार तडकावला. त्याला भुवनेश्‍वर कुमारनेही उपयुक्त 19 धावांची खेळी करत साथ केली. या जोडीने आठव्या गड्यासाठी नाबाद ८४ धावांची भागीदारी करत संघाचा विजय साकार केला.

श्रीलंकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९ बाद २७५ धावा केल्या. मालिका विजयासाठी भारताला २७६ धावा करण्याचे आव्हान ठेवले होते. या सामन्यातही श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीमुळे ५० षटकांत ९ बाद २७५ धावांचे आव्हान उभे केले. श्रीलंकेकडून चरिथ असालांकाने ६५ तर, सलामीवीर अविष्का फर्नांडोने ५० धावा करत या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सलामीवीर फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी ७७ धावांची सलामी दिली. हे दोघे खेळत असताना भारतीय गोलंदाज दडपणाखाली आले होते. मात्र, कर्णधार शिखऱ धवनने केलेला गोलंदाजीतील बदल सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने भानुकाला ३६ धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. लगेचच याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने भानुका राजपक्षेलाही बाद केले. यावेळी यजमान संघाची अवस्था २ बाद ७७ अशी झाली. त्यानंतर धनंजय डी सिल्वासह फर्नांडोने डाव सावरत संघाचे शतक फलकावर लावले. पहिल्या सामन्यात एकही बळी मिळवता न आलेल्या भुवनेश्‍वर कुमारने फर्नांडोला ५० धावांवर बाद केले. त्यानंतर डीसिल्वाही ३२ धावांवर बाद झाला. कर्णधार दासून शनाकानेही निराशा केली. प्रमुख फलंदाज बाद होत असताना चरिथ असालंकाने एकहाती किल्ला लढवला.

मात्र, अर्धशतकानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो भुवनेश्‍वरच्याच गोलंदाजीवर ६५ धावांवर बाद झाला. त्याचवेळी करुणारत्नेने पुन्हा एकदा पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात तळात फलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याचे अर्धशतक पुन्हा एकदा हुकले. मात्र, त्याने ४४ धावांची खेळी करत संघाला २७४ धावांची मजल मारून दिली. भारताकडून चहल व भुवनेश्‍वर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. त्यांना सुरेख साथ देताना दीपक चहरने २ बळी मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here