विराट कोहली, तमन्ना भाटिया अडचणीत

मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल; अटकेची मागणी

मुंबई (हितेश मिस्त्री) – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आले असून दोघांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दोघांवर ऑनलाईन जुगार खेळण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला असून याचिका कर्त्याने दोघांच्या अटकेची मागणी केली आहे. चेन्नईतील एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. तसेच ‘एमएचसी’ वरून ऑनलाईन जुगार खेळण्यावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाईन जुगार कंपनी विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांच्या सारख्या सेलेब्रिटी लोकांचा वापर करून तरुणाचे ब्रेनवॉश करत आहेत. त्यामुळे दोघांना अटक करण्याची मागणी, याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत केली आहे. तसेच याचिकाकर्त्याने यावेळी एका तरुणाचे उदाहरण दिले. ऑनलाईन जुगारात हरलेले पैसे परत करू न शकल्याने या तरुणाने आत्महत्या केली, असा दावा याचिककर्त्याने केला आहे.
दरम्यान, विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत मुंबईतील घरी लॉकडाऊनची मजा घेत असून पुढील सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलची तयारीही करत आहे. विराटकडे आरसीबीचे नेतृत्व असून यंदा आयपीएल चषक जिंकून देण्याचा त्याचा इरादा असणार आहे. आयपीएलचा 13 वा सिजन 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here