अखेर ऑलिम्पिकचा बिगुल वाजणार

टोकियो : मागील वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. मात्र, टोकियोमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यातच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशातून खेळाडू आणि अधिकारी येत असल्याने जपानमधील कोरोनाचा धोका वाढेल अशी स्थानिकांना भीती होती. त्यामुळे बहुतांश जपानी नागरिकांचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध होता आणि अजूनही आहे. परंतु, आता कोरोनामुळे प्रेक्षकांविना यंदाच्या स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

एका वर्षाने लांबणीवर पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी रंगणार असून शनिवारपासून मुख्य स्पर्धांना सुरुवात होईल. यंदाच्या स्पर्धेत २०५ देशांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या देशांचे ११ हजारहूनही अधिक खेळाडू आपली गुणवत्ता जगासमोर सिद्ध करतील. ऑलिम्पिकच्या ३२ व्या पर्वाच्या आयोजनात आयओसी आणि आयोजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

यंदाचे ऑलिम्पिक बऱ्याच गोष्टींमुळे ऐतिहासिक ठरणार आहे. एका वर्षाने लांबणीवर पडलेले हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. तसेच यंदा ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठीही आयओसीने नियमांमध्ये बदल केला असून एक पुरुष आणि एक महिला असे दोन धवजवाहक नेमण्यास सर्व देशांना सांगण्यात आले आहे. यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा आयओसीचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे समाजात वर्णद्वेषाला थारा नसल्याचा संदेशही ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात देण्यात येणार आहे. भारताने यंदा आपले ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वात मोठे पथक पाठवले असून यात १२० खेळाडूंचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here