स्टार खेळाडूंनी पिछाडीवर टाकत पदार्पणातच चमकदार कामगिरी
टोकियो : ऑलिम्पिकमध्ये पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. पात्रता फेरीत त्याने अतानुपेक्षा अधिक गुण मिळवल्याने मिश्र दुहेरीत तो दीपिकासोबत निशाणा साधणार आहे.
दरम्यान, आज बहुप्रतिक्षीत टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला सुरवात झाली आहे. दुसरीकडे याआधीच काही स्पर्धांना सुरवातही झाली आहे. तिरंदाजीतील भारतातील सर्वात यशस्वी जोडी असलेल्या दीपिका कुमारी आणि अतानु दासकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी प्रकारात पहिल्यांदाच मिश्र दुहेरीचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारी (२४ जुलै) मिश्र दुहेरीचे सामने होणार आहेत.
नियमांनुसार वैयक्तिक गटात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या तिरंदाजांचे गुण एकत्र करून मिश्र दुहेरीसाठीची क्रमवारी ठरवली जाते. भारताकडून महिला गटात फक्त दीपिका कुमारीने भाग घेतला आहे. तिने ६६३ अंकांसह नववे स्थान मिळवले आहे. तर पुरुष गटात अतानु दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय यांनी सहभाग घेतला होता. स्टार खेळाडू असलेल्या अतानुला मागे टाकत प्रवीण जाधवने ६५६ अंकांसह ३१ वे स्थान मिळवले. ६५३ अंकासह अतानुला ३५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जाधव आणि दीपिकाच्या अंकांच्या जोरावर भारताला नववे स्थान मिळाले आहे.
त्यामुळे मिश्र गटात भारताकडून दीपिका आणि प्रवीण सहभागी होतील, असा निर्णय आर्चरी असोसिएशनने घेतला. अतानु आणि दीपिका हे मिश्र दुहेरीत खेळले असते तर ऑलिम्पिकमध्ये मिश्र गटात खेळणारे ते पहिले पती-पत्नीची जोडी ठरले असते. दीपिकासोबत मिश्रमध्ये खेळण्याचं अतानुचं स्वप्न भंगलं असलं तरी तो वैयक्तिक गटात देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल.






