महादेवपुरा, कोळीवाडा भागात रस्त्यांची दुरावस्था त्वरीत काँक्रीटीकरण करा : शिवसेनेची मागणी

दोंडाईचा (प्रतिनिधी) : शहरातील महादेवपुरा, कोळीवाडा भागात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेकवेळा रस्त्याचे मोजमाप करण्यात आले. मात्र, रस्ता झालाच नाही. त्यामुळे या भागात त्वरीत रस्त्याचे काँक्रीटीकरण करा, अशी मागणी शिवसेना-युवासेनेतर्फे करण्यात आली. मागणीचे निवेदन गुरुवार दि.23 रोजी दोंडाईचा-वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रविण निकम यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, महादेवपुरा भागात मोठ्या पुलाजवळील कोळीवाडा भागात अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता व गटारी नसल्यामुळे परिसरातील रहिवाशांचे घरातील सांडपाणी हे कच्च्या रस्त्यावर वाहत असते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रस्ता नसल्यामुळे येणारे-जाणारे नागरिक तसेच वाहनधारक घसरुन पडण्याच्या व त्यांना दुखापत झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.

महादेवपुरा भागातील मोठ्या पुलाजवळ अनेक वेळा रस्त्याचे मोजमाप करण्यात आले. रस्ता तयार करण्याचा देखावा करण्यात आला. मात्र, आजपर्यंत रस्ता झालाच नाही. रस्ता तयार होणेसाठी अनेक नागरिकांनी मागणी केली. मात्र त्याला नगरपरिषदेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. हा जनतेवर अन्याय असून या भागात त्वरीत रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे, असेही शेवटी म्हटले आहे.

निवेदनावर सुमन कोळी, शांता कोळी, शोभा कोळी, रानी कोळी, आशा पारधी, मनिषा महाजन, अरुणा पवार, मिरा कोळी, मनिषा कोळी, बेबीताई मराठे, वंदना कोळी, विद्या पवार, तुळशाबाई कोळी, आरती कोळी, मोना कोळी, रेखा कोळी, रंजना कोळी, बेबीताई ठाकूर, सुरेश कोळी, सागर कोळी, सादिक शेख, निलेश सदाराव, राहुल परदेशी, पंकज कोळी, बबलु कोळी, ज्ञानेश्वर कापुरे, विठोबा ठाकूर यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिकांरी स्वाक्षरी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here