पीव्ही सिंधू सलग तिसरा विजय मिळवत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

टोकियो : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज (२९ जुलै) रोजी झालेल्या सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्वी फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा ४० मिनिटांमध्ये २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला.

सिंधूने राउंड १६च्या फेरीत शानदार खेळ केला. हा तिचा सलग तिसरा विजय ठरला आहे. मियाने सिंधूला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूने आक्रमक खेळ केला आणि सलग दोन गेम जिंकत सामना जिंकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित करण्यासाठी सिंधूला आता फक्त एक विजय हवा आहे. सिंधू अंतिम ८ मध्ये दाखल झाली आहे.

यापूर्वीच्या सामन्यामध्येही सिंधूने दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता. उपउपांत्यपूर्वी फेरीमधील आपला प्रवेश निश्चित करताना सिंधूने जागतिक क्रमवारीत ३४व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या नॅन यि चेऊंगला पराभूत केलेलं. सिंधूने चेऊंगचा ३५ मिनिटांत २१-९, २१-१६ असा पराभव केलेला. सिंधूने चेऊंगविरुद्धच्या सहाव्या सामन्यातही सरशी साधली. या सामन्यात सिंधूने पहिल्याच गेममध्ये आरामात विजय मिळवत चेऊंगवरील दडपण वाढवले. परंतु दुसऱ्या गेममध्ये चेऊंगने तिला तोलामोलाची टक्कर दिली.

पदकतालिकेत सध्या जपान १३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य पदकासह पहिल्या तर चीन १२ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका ११ सुवर्ण, ११ रौप्य आणि ९ कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४५व्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here