भगत सिंहांवरील नाटकाची सुरु होती तालीम
बदायू (उत्तरप्रदेश) : येथील बाबट या गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद भगतसिंह यांच्यावरील नाटक विद्यार्थी सादर करणार होते. त्या नाटकाच्या तालिमीदरम्यान भगतसिंहाची भूमिका साकारणारा विद्यार्थी भगत सिंह फासावर लटकल्याच्या घटनेची तालीम करत असताना अचानक त्याच्या पायाखालील स्टूल सरकला आणि गळफास लागून त्याचा मृत्यू झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बाबट गावातील भुरे सिंह यांचा मुलगा शिवम या नाटकात शहीद भगत सिंह यांची भूमिका साकारत होता. गुरुवारी त्याचे आईवडील शेतात कामासाठी गेले होते. त्यावेळी परिसरातील इतर मुले त्याच्या घरी एकत्र आली आणि त्यांनी नाटकाची तालीम करण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला ते हे नाटक सादर करणार होते. त्यामुळे ते नाटकाचा सराव करत होते.
नाटकाची तालीम करत असताना शिवम भगत सिंह फासावर लटकल्याच्या घटनेची तालीम करत होता. त्यावेळी त्याच्या पायाखालील स्टूल अचानक सरकला आणि गळफास लागून त्याचा मृत्यू झाला. मुलांनी घाबरून शेजारच्यांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. शिवमच्या आईवडिलांना घटनेबाबत कळवून त्यांना शेतातून बोलवण्यात आले. त्यांनी घरी आल्यावर शिवमवर अंत्यसंस्कार केले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली नाही.
बदायूतील वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना घटनेबाबत समजल्यावर त्यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. तेव्हा शिवमवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी घटनेची माहिती घेतली असून कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.






