बीएसएफ जवानांसोबत मीराबाई चानूने साजरा केला पदकाचा आनंद

इंफाळ : टोकियो ऑलिंम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने रौप्यपदक जिंकले. आणि गेल्या २१ वर्षांपासून भारताला असेलली पदकाची अपेक्षा पूर्ण केली. मायदेशात परतल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. मात्र पदकाचा आनंद साजरा करण्यासाठी मीराबाईने तिच्या गावाजवळ असलेल्या एका बीएसएफ कॅम्पला भेट दिली आणि तेथील जवानांसह आपल्या ऑलिम्पिक प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच पदक जिंकण्याचा आनंदही त्यांच्यासोबत साजरा केला.

वेटलिफ्टिंगमध्ये पहिलं आणि एकमेव रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाईवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता तिने भारताची सीमा गाठल्याने ती पुन्हा एकदा अनेकांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. राज्यातील भेटी-गाठी आणि सत्कार सोहळ्यातून वेळ काढत तिने देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांची भेट घेतली. बीएसएफने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मीराबाईच्या या भेटीबाबत माहिती देत फोटोही शेअर केले आहेत.

यावेळी बीएसएफतर्फे मीराबाईचा सत्कार करण्यात आला. सीमेवर तैनात जवानांसाठी हा अभिमानाचा क्षण होता असेही बीएसएफने म्हटले आहे. मीराबाईचे गाव नॉन्गपोकजवळच हा बीएसएफचा कॅम्प आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here