टोकियो : कोरोनाच्या लाटेमुळे एक वर्षभर स्थगित झालेले ऑलिंम्पिक कोरोनाच्या सावटाखालीच सुरुवात झाली होती. मात्र जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात खेळाडूंशी संबंधित प्रकरणांची संख्या कमी आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आयोजन समितीने तयार केलेल्या कडक नियमावलीचे पालन केले जात आहे. तरीही काही जणांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल ६ खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी तोशिरो मूतो म्हणाले की, जॉर्जियाचे दोन ज्युडो खेळाडू फिरायला गेले होते. मंगळवारी त्यांची स्पर्धा संपल्यानंतर वाजा एम आणि लाशा एस टोकियो टॉवरजवळ दिसले. हे कोरोना नियमांचे उल्लंघनच आहे. याबद्दल जॉर्जिया दूतावासाने माफी मागितली आहे, असे मुतो म्हणाले. उर्वरित चौघांमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेतील कंत्राटदारांचा समावेश आहे, जे ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळले होते.
हकालपट्टी करण्यात आलेल्या ६ जणांमध्ये जॉर्जियाच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी नुकतेच रौप्य पदक जिंकले होते. आपत्कालीन परिस्थितीत टोकियोसह इतर काही शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजनाशी संबंधीत सर्वजन या संसर्गापासून दूर राहतील, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. पण त्याकडे या ६ जणांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.






