काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांचा दावा
लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहण्याची नागरिकांची इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी विधानसभा निवडणुका लढल्या जातील. जनतेसोबतच उत्तर प्रदेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही प्रियांका गांदी यांना मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहण्याची इच्छा असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे १०० हून अधिक पदाधिकारी गेल्या तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या नेत्यांना काँग्रेसच्या इतिहासापासून ते बूथ मॅनेजमेंटपर्यंत माहिती दिली जातेय. त्यांना खुद्द छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून निवडणुकीचे धडे मिळत आहेत. या प्रशिक्षणातही प्रियांका गांधी बुधवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेस स्वबळावर उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा दावाही तिवारी यांनी केलाय. काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातील ४०३ जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली जातेय. राज्यात समाजवादी पक्ष किंवा आणखीही कोणत्याही पक्षासोबत आघाडीची चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.






