फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवी दहियाला रौप्यपदक!

टोकियो : पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली.

रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे. रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

आजवरकुस्तीपटू सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. रवीच्या आधी भारताने कुस्तीमध्ये ५ पदके जिंकली आहेत. सुशीलव्यतिरिक्त योगेश्वर दत्तने २०१२मध्ये कांस्य, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.

कोण आहे रवी दहिया?
हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावाचा रवी रहिवासी आहे आणि त्याच गावातील आखाड्यात त्याने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. या गावातील महावीर सिंग आणि अमित दहिया यांनी भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताची राजधानी दिल्ली येथील छत्रसाल कुस्ती स्टेडियम हे रवीचे होम ग्राउंड आहे आणि त्याने तेथे १० -११ वर्षे वयापासून सराव केला आहे. जागतिक पातळीवर खेळणारे अनेक पैलवान या ठिकाणी सराव करतात. २३ वर्षीय रवीने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (२०१९), २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (२०१८) आणि आशियाई कुस्ती स्पर्धा (२०२० आणि २०२१)मध्ये पदके जिंकली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here