प्रशिक्षक मुराद गैदारोव यांच्यावर कारवाई : ऑलिंम्पिक व्हिलेज तात्काळ सोडण्यास सांगितले
टोकियो : गुरुवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत दीपक पुनियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याला सॅन मारिनोच्या माईल्स अमाईनने ३-२ असे पराभूत केले. सामना संपल्यानंतर दीपक पुनियाचे परदेशी प्रशिक्षक मुराद रेफरींच्या खोलीत गेले आणि तेथे सामन्यावेळी उपस्थित असलेल्या रेफरीला मारहाण केली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर मुराद यांना ऑलिम्पिक व्हिलेज सोडण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे ओळखपत्रही काढून घेण्यात आलं आहे.
(1/2) Indian Wrestling team's foreign assistant coach Mr Murad Gaidarov who was involved in an uncalled incident of assault on one of the match referees, is being withdrawn from the Tokyo Olympic Village immediately and is being called back to India on the latest flight.
— rajeev mehta (@rajeevmehtaioa) August 6, 2021
Mr Murad Gaidarov is removed from the Olympic Village and will be transported back to India on 10.30 flight from Tokyo.
— rajeev mehta (@rajeevmehtaioa) August 6, 2021
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे. आणि मुराद यांना ऑलिम्पिक व्हिलेजमधून काढून टाकण्यात आले असून त्यांना भारतात पाठवले जाणार आहे, अशी माहितीही दिली. या घटनेनंतर कुस्तीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था फेडरेशन इंटरनॅशनल डेस लट्स असोसिएजने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला या प्रकरणाची माहिती दिली. यासह, भारतीय कुस्ती महासंघासोबतही चर्चा केली. भारतीय कुस्ती महासंघाने मुराद यांना चेतावणी देऊन सोडले असून त्यांचा करार संपुष्टात आणला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मुरादचे मान्यता पत्र रद्द केले आहे. तसेच टोकियोमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय पथकाला मुरादला लगेच ऑलिम्पिक व्हिलेजमधून काढून टाकावे, असे लेखी पत्र दिले आहे. त्यानुसार मुराद यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहितीही भारतीय पथकातर्फे देण्यात आली.
FILA ने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला मुरादवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. मुराद हा माजी रशियन खेळाडू असून याआधीही त्याने अशाच प्रकारचे कृत्य केले आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये रशियाच्या मुरादने ७४ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले होते. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकवेळी त्याला अपात्र ठरविण्यात आले होते. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर त्याने विजयी खेळाडूवर हल्ला केला होता.






