पुण्यात असलेली अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा ईडीच्या ताब्यात
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना दणका दिला आहे. ईडीने पुण्यात असलेली अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची ही ४ कोटी रुपये किमतीची जागा ईडीने ताब्यात घेतली आहे.
पुणे येथील एका सरकारी जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले आहे. यानंतर त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ईडीनेही गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते.ईडीने ११ फेब्रुवारीला अविनाश भोसले यांच्या ४ मालमत्तांवर छापे टाकले होते. त्यानंतर अमित भोसले याला ताब्यात घेत चौकशीही केली. मात्र १२ फेब्रुवारीला दोघेही चौकशीसाठी हजर न राहता त्यांनी ईडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसले आणि त्यांचे पुत्र अमित भोसले यांच्यावर ईडीचे लक्ष होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने दोघांनाही समन्स धाडले होते. गेल्या महिन्यात त्यांची सुमारे ५ तास चौकशीही झाली होती.






