नवी दिल्ली : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात ऑगस्ट या दिवशी भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता याची आठवण म्हणून आता सात ऑगस्ट हा दिवस भारतीय ॲथलेटिक्स महासंघाकडून राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
नीरज चोप्राने या निर्णयावर आनंद व्यक्त करतानाच महासंघाला धन्यवादही दिले आहेत. महासंघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीरजसह सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी थाळीफेकीतील अव्वल महिला खेळाडू कमलप्रीत कौर आणि माजी धावपटू अंजू बाबी जॉर्ज दिल्लीत सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
नीरज चोप्रा म्हणाला, ”राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतर मला राष्ट्रीय शिबिरात नेण्यात आले. हा माझ्या कारकिर्दीचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. कारण राष्ट्रीय शिबिरात जेव्हा मी माझ्यापेक्षा मोठे खेळाडू बघायचो तेव्हा मला प्रेरणा मिळत असे. या प्रेरणेतूनच मी ऑलिम्पिक विजेत्यापर्यंतचा प्रवास केला आहे,” असेही त्याने सांगितले.
याच कार्यक्रमात महासंघाने दरवर्षी सातत्याने भालाफेकीच्या स्पर्धा घेण्यात येतील अशी घोषणाही केली. महासंघाच्या नियोजन समितीने भालाफेक स्पर्धेला आणखी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी देशभरात स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.






