अफगाणिस्तानात लुटालूट पळापळ; काही भारतीय अद्याप काबूलमध्ये अडकले

काबूल : तालिबानने काबूलवर ताबा मिळविल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बिघडली असून, सर्वत्र लुटालूट, पळापळ सुरु आहे. विदेशी नागरिकांसह अफगाणी जनतेलादेखील देशाबाहेर जायचे आहे. अद्याप काही भारतीय काबूलमध्ये अडकून पडले असून, त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. एअर इंडियाच्या दोन विमानांना स्टँडबाय मोडवर ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारनं दिल्या होत्या.

अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही दिवसातच संपूर्ण देश तालिबानी दहशवाद्यांच्या ताब्यात गेला आहे. यानंतर अफगाण नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तालिबानी दहशतवादी रस्त्यावर गोळीबार आणि लुटालूट करीत आहेत. महिला घरातच लपून बसल्या आहेत.

सोमवारी काबूल विमानतळावर मुंबईतील लोकल प्रमाणे प्रचंड गर्दी उसळली होती. विनातिकीट, विनाव्हिसा लोक विमानात घुसत होते, लटकत होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली. अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केला. दरम्यान, चेंगराचेंगरीत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. तालिबान सरकारने हवाईहद्द बंद केल्यानं एअर इंडियाला उड्डाणं रद्द करावी लागली. यानंतर आता भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलानं सूत्रं हाती घेतली आहेत.

भारतीय हवाई दल पुन्हा एकदा परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी देवदूत ठरताना दिसत आहे. हवाई दलाच्या दोन सी-१७ ग्लोबमास्टर विमानांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करत आहेत. यातल्या एका विमानानं रविवारी रात्री उड्डाण केलं. सोमवारी सकाळी काही भारतीयांना घेऊन ते मायदेशी परतलं. आता दुसरं विमान लवकरच मायदेशी परतेल. या दोन्ही विमानांच्या अनेक फेऱ्या होतील आणि सर्व भारतीयांना सुखरुप माघारी आणलं जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here