सरपंच पत्नीच्या कारभारात पतीने हस्तक्षेप केल्यास ग्रामविकास खात्याकडून पतीची होणार चौकशी
अलिबाग (प्रतिनिधीराजेश बाष्टे) : ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार तसेच अनियमितता, मालमत्ता व निधीचा अपहार करणे, मुळ दस्तऐवजावर खोट्या सह्या व बनावट कागदपत्रांचा अपहार, गैरप्रकार केल्यास ग्रामपंचायत सरपंचांना आता जेलची हवा खावी लागणार आहे. राज्य शासनाने तशा प्रकारचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांना दिले आहेत. त्यामुळे आता सरपंचांच्या मनमानीला चाप बसणार आहे. शासनाच्या या आदेशात सरपंचाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत
ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकार सध्या समोर येत आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अधिकारी यांच्या संगनमताने हे प्रकार होत आहेत. असे शासन दरबारी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. तसेच गावाची बदनामीही होत असल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे.
याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने संबंधित भ्रष्टाचारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीमधील विकास कामांच्या रकमेमध्ये विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत प्राथमिक चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.
….तर सरपंच पतीवरही होणार कारवाई
अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच कारभार हाकत आहेत या महिलांच्या सोबत पतीही कारभारात लक्ष घालत असल्याने ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांसह विविध दाखल्यावर पती स्वाक्षऱ्या करत असल्याचे आढळून आल्यास आणि अशा प्रकारचे तक्रार दाखल करण्यात आल्यात पती विरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






