परराज्यात विक्री करणा-या सराईत टोळीकडून चारचाकी वाहने जप्त

फिर्यादीने सदरच्या कंपनीबाबत नोएडा, उत्तर प्रदेश येथे जावून माहिती काढली असता त्यास अशी कोणतीही कंपनी मिळून आली नसल्याने त्यास त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : फसवणूक करुन चारचाकी वाहने परराज्यात विक्री करणा-या सराईत टोळीस गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल १३ वाहने जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोणी काळभोर पोलिस स्टेशन गु. र. क्र. ४२९/२०२१ भादवि कलम ४०६, ४२०, ३४ या गुन्हयातील फिर्यादी हे ओला कंपनीमध्ये स्वताःची स्विफ्ट डिझायर कार चालवितात. ओला कंपनीमध्ये कार चालवित असताना त्यांची ओळख मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद सय्यद गिलानी याच्याशी झाली. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे सांगून त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे सांगितले. फिर्यादीस अमिष दाखवून १५/०३/२०२१ रोजी ते २७/०७/२०२१ रोजी अशा साडे चार महिन्याच्या कालावधीमध्ये फिर्यादीकडून त्याची व इतरांची अशी एकूण २८ चारचाकी वाहने ताब्यात घेतली. त्याने वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेवून फिर्यादीची फसवणूक करून तो फरार झाला होता. फिर्यादीने सदरच्या कंपनीबाबत नोएडा, उत्तर प्रदेश येथे जावून माहिती काढली असता त्यास अशी कोणतीही कंपनी मिळून आली नसल्याने त्यास त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. नमूद गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ करित होते.

१४/०८/२०२१ रोजी सपोनि नरेंद्र पाटील व पथक युनिट-६ चे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पो. ना. कारखेले व पो.ना. मुंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की नमूद गुन्हयातील इनोव्हा कार क्रं एम एच १४ एफ सी ०३७१ ही दौंड, पुणे येथे बस स्टैंड परिसरामध्ये विक्रीकरिता येणार आहे. खात्रीशिर माहिती मिळाल्याने गणेश माने, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले. स्टाफसह दौंड, पुणे येथे जावून बस स्टैंड परिसरामध्ये सापळा रचला. १) मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय ३८, रा. फ्लॅट नं ४०५, युनिटी टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे ४८), २) ओंकार ज्ञानदेव वाटाणे (वय २८, व्यवसाय नाही, रा. मु. पो. हिंगणी बेर्डी, ता. दौंड, जि. पुणे) व ३) मोहमद मुजीब मोहमद बसीर उद्दीन (वय ४८, व्यवसाय चालक, रा. १५-१७३/ १३१/ए, संतोषनगर, पाणी टाकी जवळ, संतोषनगर, हैद्राबाद, राज्य तेलंगणा) यांना त्यांच्याकडील इनोव्हा कारसह ताब्यात घेवून अटक करण्यात आली. त्यांची न्यायालयाकडून २०/०८/२०२१ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड प्राप्त करून नमूद आरोपींकडून पोलिस कस्टडीदरम्यान महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील विजयनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) व बालकोंडा (जि. निजामाबाद, तेलंगणा) येथून एकूण १,२२,००,०००/- रु किंमतीच्या ०४ इनोव्हा क्रिस्टा, ०१ मारुति सूझूकी इर्टिगा, ०२ स्विफ्ट डिझायर, ०४ आयशर, ०२ अशोक लेलंन्ड अशी एकूण १३ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. नमूद गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलिस सह-आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, अशोक मोराळे, पोलिस उपआयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलिस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलिस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here