अफगाणिस्तान क्रिकेट संघाला तालिबानचा पाठिंबा

काबूल : अफगाणिस्तानमधील क्रिकेटविषयी भीती कायम आहे. देशावर तालिबान्यांच्या ताबा घेतल्यानंतर तेथील लोकांचं जीवन बदललं आहे आणि क्रिकेटपटूंची परिस्थिती काही वेगळी नाही. पाकिस्तानसोबतची पूर्वनियोजित एकदिवसीय मालिका होणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर आता तालिबानकडून क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही, असं जाहीर करण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनी एरियाना न्यूजच्या अहवालानुसार, तालिबानच्या राजकीय छावणीशी संबंधित असलेल्या अनस हक्कानी या नेत्याने अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अधिकारी असदुल्ला आणि नूर अली झाद्रान यांची भेट घेतली.

यावेळी बोलतांना हक्कानी म्हणाले की, अफगाणिस्तान क्रिकेट संघ आणि खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी तालिबान त्वरित कारवाई करेल. यावेळी खेळाडूंनी हक्कानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि तालिबान क्रिकेटला कायम पाठिंबा देईल, अशी आशाही व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here