गायकवाड पिता-पुत्रावर चिखली ठाण्यात गुन्हा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : चिखली मधील एका गॅरेज चालकाला दिलेल्या १० लाखांच्या बदल्यात २२ लाख रुपये वसूल करून फार्म हाऊसवर नेऊन हवेत गोळीबार करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गॅरेज चालकाच्या पाच गुंठे जागेचे खरेदीखत जबरदस्तीने करून घेतले. याप्रकरणी गायकवाड पिता-पुत्रासह चार जणांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), राजाभाऊ अंकुश व मिश्रा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चिखली येथील एका गॅरेज चालकाने मंगळवारी (दि. २४) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे साने चौक, चिखली येथे अंश ऑटोविल नावाचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेज मध्ये गायकवाड पिता-पुत्र त्यांच्या गाड्या दुरुस्तीसाठी घेऊन येत असत. फिर्यादी यांना गॅरेजमध्ये नवीन मशिनरी आणण्यासाठी पैशांची आवश्‍यकता होती. त्यामुळे त्यांनी गायकवाड पिता-पुत्राकडून १० लाख रुपये उसने घेतले.

आरोपींनी फिर्यादी यांना पाच टक्के दराने कर्ज देऊन फिर्यादी यांच्याकडून पाच-पाच लाख रुपयांचे दोन चेक लिहून घेतले. फिर्यादी यांनी घेतलेल्या १० लाख रुपये कर्जापोटी 22 लाख रुपये वसूल केले. यानंतर व्याज थकल्याचे सांगत वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी राजाभाऊ याने फिर्यादी यांना त्यांच्या गॅरेज मधून जबरदस्तीने गाडीत घालून गायकवाड यांच्या औंध येथील घरी नेले. तिथून त्यांना सुसगाव येथील फार्म हाऊसवर नेले. या ठिकाणी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना रूममध्ये कोंडून पिस्तुलचा धाक दाखवून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी यांची पाच गुंठे जागेचे मूळ खरेदीखत जबरदस्तीने घेतले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here