पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरात अवैधरित्या दारु व अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे शाखेने विमानतळ, कोंढवा, हडपसर या फक्त तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात तब्बल १२ ठिकाणी कारवाई केली आहे. दारु विक्री, हुक्का पार्लर व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर ११ गुन्हे दाखल केले असून २ लाख ७ हजार ५७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारु विक्री होत असून अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना कारवाईचे आदेश दिले.
गुन्हे शाखेतील २ पोलीस निरीक्षक, २४ उपनिरीक्षक व पोलीस मुख्यालय तसेच गुन्हे शाखेकडील ३२ अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली. त्यांनी एकाच वेळी विमानतळ, कोंढवा व हडपसर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. त्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.






