हरियाणात शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

हरियाणा (प्रदेश उपसंपादक नंद पाल) : येथील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा मतदारसंघ असलेल्या कर्नालमध्ये बसताडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यात भाजपच्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ठिय्या मांडून रस्ते रोखून धरले तर विरोधी पक्षांची सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यासोबत जिंद चौक, बसताडा टोलनाका, रोहतक येथील मकडौली टोलनाका, नरवानामधील बद्दोवाल टोलनाका, कैथलमधील तितरम चौक, पटियाला मार्गावर ठिकाणी शेतकऱ्यांनी ठाण मांडले. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यांच्या मघोमध बसले. अनेक ठिकाणी वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागली.

काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवावला यांनी या लाठीचार्जबाबत सरकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही लाठीमारीचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, सरकार लाठ्या व बंदुकीच्या सहाय्याने नाही तर परस्पर सहमतीने चालवले पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड़ म्हणाले की, पोलिसांनी कोणत्या परिस्थितील लाठीचार्ज केला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here