भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : महाराष्ट्र शासन कृषी विभागतील तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत कुऱ्हा पानाचे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत सावंत माली रयत बाजार अभियान अंतर्गत विकेल ते पिकेल या संकल्पनेच्या माध्यमातून भाजीपाला विक्री ओट्यांचे उदघाटन आमदार संजय सावकारे व तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’ अभियान योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन गट शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना कृषि विभागामार्फत प्रत्यक्षात उतरवली आहे. कृषीप्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहिला पाहिजे. त्यासाठी शेतातून थेट शहरातल्या घरापर्यंत अशा प्रकारची मूल्यसाखळी निर्माण करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले आहेत. शेतकरी संघटीत होणे गरजेचे असून शेतकरी उद्योगक्षम होऊन अन्नदाता सुखी झाला पाहिजे अशी इच्छा मा आ संजय सावकारे यांनी व्यक्त केली.
बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे याचे नियोजन करुन महाराष्ट्रात विभागवार शेती करावी. दर्जेदार उत्पन्न घेऊन ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना यशस्वी करण्याचे आवाहन तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी केले. शेतकऱ्यांनी पिकविलेला ताजा व किडमुक्त भाजीपाला थेट ग्राहकाला कमी किमतीत विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कुऱ्हा पानाचे यांनी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करुन देऊन पानवेल कृषि विज्ञान मंडळ ने भाजीपाला विक्रीसाठी आणला यामुळे शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून चांगली सुरुवात गावात सुरु झाली आहे. असे आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

यावेळी सरपंच जीवन पाटील,उपसरपंच विलास रंदाळे, माजी जि प सदस्य समाधान पवार, ता कृ अधिकारी धनंजय पोळ, तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव,कृषी सहायक वसंत पवार,पानवेल कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद उंबरकर,सचिव विनोद बारी ,कृषी मित्र संतोष वराडे यांची उपस्थिती होती.






