लाचखोर उपनिरीक्षकासह खाजगी ‘पंटर’विरोधात एसीबीचा गुन्हा

bribe-to-police
file photo

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) ।  एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि चॅप्टर केस करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) त्याच्या खाजगी पंटराविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसीबीच्या पथकाने या प्रकरणातील खाजगी पंटरला ताब्यात घेतले असून, या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

भुसावळ येथील एका तक्रारदाराविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करणे आणि चॅप्टर केस करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. अखेर ही तडजोड २० हजार रुपयांवर निश्चित झाली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी थेट जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली.

तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीने सापळा रचला होता. त्यानुसार,  मागच्या महिन्यात (एप्रिल २०२६) तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता, उपनिरीक्षक सांगळे आणि पंटरला संशय आल्याने त्यांनी ऐनवेळी लाच स्वीकारण्यास नकार दिला. लाचेची रक्कम स्वीकारली गेली नसली, तरी एसीबीच्या कायदेशीर पडताळणीत उपनिरीक्षकाने लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. या पडताळणीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने भुसावळात धडक कारवाई केली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खाजगी पंटर सलीम कुरेशी (रा. बोदवड) यांच्याविरोधात भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपी उपनिरीक्षक राजू सांगळे हे सध्या ‘सीक रजेवर’ (आजारी रजेवर) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर त्यांचा खाजगी पंटर सलीम कुरेशी याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.

ही धडक कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here