भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) । तालुक्यातील साकरी येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळून आले. गावालगत असलेल्या विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून याप्रकरणी एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे.
साकरी येथील दोन्ही अल्पवयीन मुली जनता विद्यालयात इयत्ता ९ वीत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुली नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगत असलेल्या सोपान फेगडे यांच्या शेतीतील विहिरीत दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला, अपघात की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.







