नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | “जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत येथून एक पाऊलही हलणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू झाले आहे. मे महिन्यातील अंगाची लाहीलाही करणाऱ्या ४२ ते ४३ डिग्री सेल्सिअसच्या धगधगत्या उन्हात, कोणत्याही सावलीशिवाय (मंडपाशिवाय) जरांगे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता समाजासाठी कडक उन्हात सुरू असलेल्या या संघर्षामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारच्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज बांधव आक्रमक झाले असून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने सुरू झाली आहेत:लातूर-अंबेजोगाई महामार्ग ठप्प: संतप्त मराठा बांधवांनी लातूर-अंबेजोगाई महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.नाशिक-पुणे महामार्गावर ‘चक्का जाम’: नाशिकजवळील शिंदे पळसे येथे शेकडो संतप्त मराठा बांधवांनी रस्त्यावर ठिय्या मांडत नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला आहे.
दुसरीकडे, हजारो मराठा कार्यकर्त्यांनी एकत्र येत पुणे-सोलापूर महामार्गावर बेमुदत चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.”सरकार मराठा समाजाचा आणखी किती अंत पाहणार?” असा संतप्त सवाल या आंदोलनादरम्यान समाज बांधवांकडून सरकारला विचारला जात आहे. धनगर समाज आणि शाहू महाराजांचा जाहीर पाठिंबाभर उन्हात सुरू झालेले हे आमरण उपोषण म्हणजे विद्यमान सरकारची अंतिम कसोटी असल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनाला आता इतर समाजांतूनही पाठिंबा मिळू लागला आहे. धनगर समाजाच्या ‘यशवंत संघर्ष सेने’च्या कार्यकर्त्यांनी थेट उपोषण स्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, कोल्हापूरचे राजे आणि खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
आंदोलनाची तीव्रता आणि उन्हाचा कडाका पाहता, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ अंतरवाली सराटी येथे धाव घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन, त्यांना किमान उन्हापासून वाचण्यासाठी शेड (मंडप) खाली बसण्याची विनंती केली आणि सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचे आश्वासन दिले. मात्र, “अनेक वेळा केवळ आश्वासनेच मिळाली आहेत, आता ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी उन्हातच उपोषण सुरू ठेवण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. या वाढत्या तापमानासोबतच आता महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचे राजकीय वातावरणही कमालीचे तापले असून, संपूर्ण राज्याचे लक्ष अंतरवाली सराटीकडे लागले आहे.







